खड्ड्यांच्या प्रश्नावरून नगर शहरातील "हा नेता" मंगळवारी मुंबईत उपोषणाला बसणार, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शनही भरवणार
अ - प्राईड वेबन्यूज टीम : नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे या प्रश्नावरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दि.३१ ऑक्टोबरला त्यांनी मंत्रालयात नगर विकासच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. नगर मनपा प्रशासन, आमदारांचे देखील वारंवार लक्ष वेधले होते. तरी प्रश्न सुटत नसल्यामुळे अखेर काळेंनी नगरकरांच्यावतीने आता राज्य शासन आणि संबंधितांना खडबडून जागे करण्यासाठी थेट मुंबईत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
तसे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर विकासचे प्रधान सचिव यांना ईमेलद्वारे लेखी कळविले आहे. या पत्राची प्रत उपमुख्यमंत्री, शहराचे आमदार, मनपा आयुक्त, आझाद मैदान पोलीस ठाणे यांना देखील पाठविली आहे.
आझाद मैदानात उपोषण
मंगळवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता निवडक काँग्रेस कार्यकर्त्यांसह काळे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये करणार आहेत. प्रश्न मार्गी लावा. नाही तर वेळप्रसंगी मुंबईत उपोषणाला बसेल. असा इशारा यापूर्वीच त्यांनी दिला होता.
नगरकरांनी खड्ड्यांचे पाठविले ११७२ फोटो
दरम्यान, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आपला वाढदिवशी साजरा न करता हार-तुर्यांना फाटा देत त्यांनी नागरीकांना शहरातली खड्ड्यांचे फोटो पाठविण्याचे जाहीर आवाहन केले होते. नगरकरांनी याला मोठा प्रतिसाद दिला असून सुमारे ११७२ फोटो आपल्याला नागरिकांनी पाठवले असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे. नागरिकांनी दाखविलेल्या या जागरूकतेबद्दल त्यांचे काळेंनी आभार मानले असून यातील निवडक फोटोंचे प्रदर्शन उपोषणास्थळी मुंबईत भरवणार असल्याचे सांगितले आहे.
"त्यांच्या" संवेदना बोथट झाल्याची टीका
नगर मनपा तसेच ज्यांच्या खांद्यावर शहराच्या नागरिकांची जबाबदारी आहे आणि शहरातील सर्व सत्ता केंद्रांचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हाती आहे अशा शहराच्या आमदारांकडून नागरिकांना यातना देणाऱ्या या गंभीर प्रश्नाच्या सोडवुकीसाठी कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. याचा काँग्रेस तीव्र निषेध करत आहे. नाईलाजास्तव शहराचा हा बदलौकिक मुंबईत जाऊन मांडण्याची वेळ नगरकरांवर आली आहे. हे दुर्दैव असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
दर्जाहीन कामे.. बाजारपेठ उध्वस्त... संपूर्ण शहराची सगळ्यांनी अवस्था....
यापूर्वी झालेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा एवढा हीन आहे की ते रस्ते देखील गायब झाले आहेत. नियोजनशून्य कामामुळे रस्त्यावर आजवर कोट्यावधी रुपये खर्च करून देखील रस्ते अनेक ठिकाणी पुन्हा खोदण्यात आले आहेत. नागरिकांना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हे समजेनासे झाले आहे. मनपाच्या वतीने एकच रस्ता दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा केल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्या रस्त्यांचीही अवस्था दयनीय झाली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
काळेंनी निवेदनात म्हटले की, शहराची मुख्य बाजारपेठ रस्त्यांअभावी उध्वस्त झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे उद्योगधंदे बुडण्याच्या मार्गावर आहेत. बाजारपेठेत येणारे नागरिक, ग्राहक देखील हैराण आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्राहक बाजारपेठेत येण्याचे टाळत आहे. सावेडी उपनगर, मुकुंद नगर, बोल्हेगाव परिसर, केडगाव, मध्य शहरासह संपुर्ण शहराच्या सर्वच भागांची परिस्थिती कधी नव्हे ते मागील ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढी दयनीय झाली आहे.
अहो, खड्ड्यांचेही श्रेय घेत फोटोसेशन करा
मनपा अधिकारी, पदाधिकारी, आमदार हे जनतेच्या पैशांतून होणाऱ्या कामांचा नारळ फोडताना, फोटोसेशन करताना नागरिकांना वर्तमानपत्रांमधून पाहायला मिळतात. मात्र लाखो, कोट्यावधी रुपये खर्च करून केलेले हे रस्ते अल्पावधीतच पुन्हा गायब होतात. पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्याच्या नवीन कामाचा शुभारंभ करताना हीच मंडळी फोटोसेशन करताना वारंवार पाहायला मिळतात. यांना याची लाज तरी कशी वाटत नाही ? असा खरमरीत सवाल काळे यांनी केला आहे. जनतेच्या पैशांतून जनतेसाठी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठीची ही लगबग करणाऱ्यांनी खड्ड्यांचे देखील श्रेय घेण्यासाठी कॅमेरे घेऊन फोटोसेशनसाठी गल्लीबोळात फिरले पाहिजे, असा उपरोधिक टोला काळेंनी लगावला आहे.
उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वीच शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न तापला
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची लगबग सध्या सुरू आहे. देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी येत्या १९ तारखेला शहरात येणार आहेत. एका बाजूला उड्डाणपुलाचा कौतुक सोहळा शहरात सुरू असताना दुसऱ्या बाजूला शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नावरून नागरिकांच्या वतीने किरण काळे आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांनी देखील एक हजारहून अधिक फोटो पाठवत काँग्रेसच्या रस्त्यांच्या व खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याच्या भूमिकेला मोठा प्रतिसाद व पाठिंबा दिला आहे.
0 Comments