माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यपाल कोशारींचा खरपूस समाचार, म्हणाले...
अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते टीकेचे धनी होत आहेत. विरोधी पक्षांनी राज्यपाल आणि भाजपावर यामुळे पुन्हा एकदा हल्लाबोल सुरू केल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
राज्यपाल हे कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत. नुकतेच त्यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात शरद पवार, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
तीन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहून देखील राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची लोकभावना समजत नसेल तर त्यांनी राज्यपाल पदी राहण्याबाबतचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून जगातील सर्वकालीन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर जनकल्याणासाठी कसा करता येतो याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी दखल घेण्याची वेळ आहे आली आहे. परमेश्वर राज्यपालांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना देखील यावेळी पवारांनी केली आहे.
0 Comments