काँग्रेसने केले खळबळजनक दावे ; राष्ट्रवादी, भाजपचे खुलासे धादांत खोटे आणि हास्यास्पद - किरण काळे
महाघोटाळ्यात सहभागींची फॉरेन्सिक, नार्को टेस्टची काँग्रेसची मागणी
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या आमदारांनी ३२ कोटीच्या स्मशानभूमी खरेदीचा विषय आपल्याला माहितीच नव्हता असा अजब खुलासा करत आपले हात झटकले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपने पक्षाचा आणि पक्षाच्या नगरसेवकांचा या घोटाळ्याला विरोधच होता आणि आहे असे म्हटले आहे. खरे तर हे नगरकरांना वेड समजत आहेत. ३२ खोकी जिरवता येत नसल्या कारणाने जनते समोर उघडे पडलेल्या यांचे दावे धादांत खोटे आणि हास्यास्पद असल्याची टीका करत महाघोटाळ्यात सहभागींची फॉरेन्सिक, नार्को टेस्ट करण्याची जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे.
भाजप, राष्ट्रवादी, महापौर यांच्या भूमिका समोर आल्यानंतर काँग्रेसने त्यावर आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. नगरसेवक कोणत्याही पक्षाचे असो. पण ते जर मनपात ज्या नगरकरांनी त्यांना विकास कामांसाठी निवडून दिले त्यांच्या पैशांची दिवसाढवळ्या लूट करत असतील तर आता नागरिकांनीच अशा सर्वच पक्षांच्या भ्रष्ट नगरसेवकांना पुन्हा निवडून देऊ नये, असे जाहीर आवाहन काळे यांनी थेट नागरिकांनाच केले आहे.
वेळ पडली तर "ती पत्र" सुद्धा जनतेसमोर आणू
काँग्रेसने नवीन धक्कादायक माहिती समोर आणली आहे. महासभेच्या आदल्या दिवशी भाजपच्या एक नव्हे तर तब्बल चार नगरसेवकांनी एकाच वेळी या महाघोटाळ्याच्या ठरावाला महासभेपूर्वीच हा ठराव संमत करण्याची मागणी वजा पाठिंबा देणारे लेखी पत्र आयुक्तांना दिले होते, असा खळबळजनक दावा काळे यांनी केला आहे. वेळ पडली तर ही पत्र सुद्धा जनतेसमोर आणून यांचा भ्रष्टाचारी बुरखा फाडू असे काँग्रेसने म्हटले आहे.
जर ही पत्र खोटी असतील तर भाजप, राष्ट्रवादीवाल्यांनी विशाल गणपती समोर येऊन शपथ घ्यावी. पत्र खोटी असल्याचं बॉण्डपेपरवर शपथपत्रं भाजप नगरसेवकांनी द्यावीत. भाजप नगरसेविकेची जागा योग्य असल्याच्या स्थळ पाहणी अहवालामध्ये राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर उपस्थित असल्याचे स्पष्ट नमूद आहे. तेही खोटे असल्यास राष्ट्रवादीने देखील तसे शपथपत्र द्यावे. अँटी करप्शन विभागाच्या माध्यमातून फॉरेन्सिक तज्ञांकडून या पत्रांची, नगररचना विभागाच्या स्थळपाहणी अहवालांची तपासणी करत तसेच या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी - भाजपच लफडं...
भाजपने आपल्या खुलासात गेल्या अडीच, तीन वर्षांपासून सक्षम विरोधक म्हणून काम करत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने याची खिल्ली उडवली असून नगरकरांना वेडं समजण्याबरोबर आंधळं सुद्धा समजता की काय ? ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आदेश झूगारून राष्ट्रवादी - भाजपच झालेलं लफडं हे नुसत्या नगरने नाही तर महाराष्ट्राने पाहिल आहे. आता तुम्ही एकत्रित केलेला महाघोटाळा देखील उभा महाराष्ट्र पाहत आहे, अशी बोचरी टीका काळे यांनी त्यांच्या खुलाशावर केली आहे.
आमदारांनी "त्यांना" वाऱ्यावर सोडले
राष्ट्रवादी, भाजपच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसशी संपर्क साधला असून आमदारांनी त्यांना कसे वाऱ्यावर सोडत स्वतः नामानिराळे झाले याबाबतच्या सुरस कथा खाजगीत एकवल्या असल्याचा दावा काळे यांनी केला आहे.
अजूनही महापौरांचा अट्टाहास कशासाठी ? काँग्रेसचा सवाल
दरम्यान, महापौरांची नव्याने मांडलेली भूमिका ही अत्यंत गोलमाल आहे. त्यांचा अजूनही अट्टाहास सुरू आहे. हा अट्टाहास सोडून देत नगर शहराला तात्काळ खड्डेमुक्त करण्याचा अट्टाहास त्यांनी धरावा. काँग्रेस स्वागत करेल. मात्र त्यांनी आपली भूमिका मागे घेतली नाही तर नगरकरांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी ठेवावी, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
0 Comments