नगर शहरातून चोरीला गेलेल्या रस्त्यांच्या राखणदारीची जबाबदारी नागरिकांचीच नाही का ?
संपादकीय II रविवार विशेष II
तात्याराव नगरकर यांच्या निर्भीड, परखड लेखणीतून...
विशेष सदर - एक शहर बारा भानगडी
दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सावेडी उपनगरातील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. चोरीच्या अनेक घटना शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज होतात. त्याचे गुन्हे पोलिसात दाखल होतात. मात्र रस्ता चोरीला गेला अशी तक्रार पोलिसात दाखल होण्याच्या घटनेने नगरकर नागरिकांचे, तसेच मनपा प्रशासनाचे देखील लक्ष वेधून घेतले. समाज माध्यमांवर देखील त्याच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. विशेष म्हणजे तक्रार दाखल होताच २४ तासांच्या आत रस्त्याचा चोरीला गेलेला काही भाग चोरांनी परत आणून जिथून चोरून नेला होता तिथे परत आणून ठेवला. यातून रस्त्याच्या झालेल्या चोरीला खऱ्या अर्थाने पुष्टी मिळाली. मुळात सार्वजनिक उपयोगासाठी असणाऱ्या सार्वजनिक रस्त्याची चोरी होतेच कशी ? मग दिवसा ढवळ्या अशा होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी राखणदारीची जबाबदारी जेवढी प्रशासनाची आहे तेवढीच नगरकर नागरिकांची नाही का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. "...या शहरातील शेकडो रस्ते चोरणाऱ्यांना, जनतेच्या पैशांतून मलिदा लाटणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आणि चोऱ्या सहन करणाऱ्या सहनशील नगरकरांना (जागरूक नगरकर नागरीक सोडून) मी तात्याराव नगरकर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो....!"
नगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था, जागोजागी पडलेले खड्डे हा काही नवीन विषय नाही. वर्तमानपत्रांची शेकडो पाने अनेक महिने, वर्षांपासून सतत या प्रश्नांवर लिहीत वर्तमानपत्रांचे शेकडो अंक एव्हाना रद्दीत जमा देखील झाले आहेत. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी अगदी गल्ली पासून ते मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत यासाठी केलेली आंदोलने देखील लोकांच्या विस्मरणात गेली आहेत. मनपाच्या ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे करून लाखो रुपयांची बीले लाटली, ज्या ठेकेदारांनी कामे न करताच लाखो रुपयांची लूट केली, त्यांनी ते रिचवत पचल्याचा ढेकर ही एव्हाना दिला आहे.
कारण दिवसाढवळ्या घातल्या जाणाऱ्या या दरोड्यांच्या राखणदारीमध्ये या शहराचे नागरिक हे जबाबदार नागरिक या नात्याने निश्चितच कमी पडतात... आणि नेमका याचाच गैरफादा ही दरोडेखोरांची टोळी घेते. सावेडीतील वैभव कॉलनी, प्रियदर्शन कॉलनीतील रस्ता चोरीच्या तक्रारीच्या निमित्ताने या शहरातील जुनेच असणारे भयान वास्तव नव्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. सुमारे ५ ते ६ महिन्यांपूर्वीच लाखो रुपयांचे बिल लाटत या भागातील रस्त्यांची कामे केली गेली.
मात्र पाऊस संपताच संपूर्ण रस्तेच गायब झाल्याचे या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. मग कुजबूज सुरू झाली. कामं निकृष्ट केल्याच्या चर्चा परिसरातील चौकाचौकांमध्ये रंगू लागल्या. महिलांच्याही घोळक्यात त्या झडू लागल्या. त्यातच संबंधित कामाचा ठेकेदार हा भाजपचा नगरसेवक असल्याने कुणाचीही निर्भीडपणाने या विषयी बोलण्याची हिंमत मात्र झाली नाही.
मात्र काँग्रेसच्या मनपाच्या माजी विरोधी पक्षनेत्याने याबाबत तक्रार केल्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला. अर्थात यात राजकीय कुरघोडी असेलही. मात्र तसे असले तरी देखील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यानेच तो गायब झाला ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल ? विशेष म्हणजे पोलिसात तक्रार दाखल होताच संबंधित भाजप नगरसेवकाने तातडीने रस्त्यासाठी डांबर, खडी, डांबरीकरणाचे मशीन, रोड रोलर, कामगार रातोरात गोळा केले. तेही अवघ्या २४ तासात.. आणि पाहता, पाहता अवघ्या काही मिनिटांतच रस्त्याचे काम केले. मात्र हे काम करत असताना या परीसरात राहणाऱ्या काँग्रेसच्या शहरातील एका बड्या नेत्याच्या दारातच रस्ता करण्यात आला. तोही पुन्हा निकृष्ट दर्जाचा करण्यात आला.
परिसरातील इतर रस्ते मात्र डांबरीकरण न करता केवळ झाडलोट करून खडी अंथरून थातूरमातूर काम करत संबंधित भाजप नगरसेवकाने मात्र अवघ्या काही मिनिटांतच तिथून पोबारा केला. यानंतर मात्र नागरिकांमध्ये मोठ्या आवाजात कुजबुज सुरू झाली. संबंधित काँग्रेस नेत्याने देखील आपल्या दारात रस्ता नसला तरी चालेल मात्र नागरिकांच्या दारातील रस्ते आधी करा, अशी भूमिका सर्वांसमोर घेतली.
काँग्रेसच्या याच प्रभागातील महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्याने माहिती अधिकारात संबंधित रस्त्याची निविदा, अंदाजपत्रक, मोजमाप वही, गुणवत्ता चाचणी अहवाल, देखक अदा केल्याच्या पावत्या अशी सगळीच जंत्री मागवली आहे. आता ही जंत्री प्राप्त झाल्या नंतर प्रत्यक्षात संबंधित पदाधिकाऱ्याकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहावे लागेल. खरंच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष काँग्रेस लावणार की हे वादळ पेल्यातीलच राहणार हे येणारा काळच ठरवेल.
मात्र यात मनपाला प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना मात्र काय मिळाले ? तर कोट्यावधी रुपयांची लूट होऊन निकृष्ट दर्जाचा रस्ता. खरे तर हा रस्ता अनेक वर्षानंतर झाला होता. या परिसराची ती गरजही होती. मात्र पाऊस पडून ही शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच शेत कोरडच राहाव, तशीच वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे. मुळात केवळ राजकीय लोकांनीच यात आवाज उठवण्या ऐवजी नागरिकांनी देखील पुढे येत निर्भीडपणे आवाज उठवण्याची जवाबदारी जागरूकतेने का बजावू नये ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो. किंबहुना नागरिकांच्या याच निष्क्रियतेचा गैरफायदा ही भ्रष्टाचारी व्यवस्था घेते. हे कटू सत्य आहे.
हे रस्ता चोरी प्रकरण जरी सावेडीतील एखाद दोन कॉलनी मधले असले, तरी देखील हीच परिस्थिती शहराच्या जवळपास सर्वच भागातील रस्त्यांची आहे. शहरातील अनेक रस्ते आज चोरीला गेले आहेत. मग याही रस्त्यांच्या चोऱ्यांच्या तक्रारी पोलिसात कधी दाखल होणार ? जबाबदार नागरिक स्वतःहून ती करणार का ? रस्त्यांच्या या चोऱ्या जर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, संगनमत करत असतील तर अशा भ्रष्ट नगरसेवकांना नागरिक पुन्हा पुन्हा निवडून देत राहणार का ? चोऱ्यांमधून गोळा केलेली माया घेऊन निवडणुकीच्या काळात मतांचा भाव हजारांवर नेऊन ठेवणारे नगरसेवक नगरकरांना हवेत की दर्जेदार नागरि सुविधा पुरविणारे लोकसेवक हवेत ? याचा विचार नागरिकांनीच आता अंतर्मुख होत करण्याची गरज आहे.
"मी तात्याराव नगरकर, मात्र याबाबत माझ्या मनातील विचार निर्भीडपणाने नगरकरां समोर मांडले आहेत. मला कुणाचीही भीती वाटत नाही. मी कुणालाही घाबरत नाही. कारण या देशात कायद्याचं राज्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. मी निवडणूक काळात मतदानासाठी कोणाचा एक रुपया सुद्धा कधी घेत नाही. ज्या दिवशी माझ्या सारखे तात्याराव नगरकर सबंध शहरभर निर्माण होतील, तेव्हा मात्र या शहरातील सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या दर्जेदार नागरि सुविधा नक्की मिळतील. यावर माझा ठाम विश्वास आहे."
तूर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र !
0 Comments