Subscribe Us

Header Ads

संपादकीय II रविवार विशेष II एसपी साहेब, नगरचा बिहार होत असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत का ?

 


संपादकीय II रविवार विशेष II 

तात्याराव नगरकर यांच्या निर्भीड, परखड लेखणीतून...

विशेष सदर - एक शहर बारा भानगडी 

पोलीस दलाचे ब्रीद "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" म्हणजे सत्याचे रक्षण आणि दुर्जनाचा नाश असे आहे. परंतु सध्या नगर शहरामध्ये दुर्जनांचे रक्षण आणि सत्याचा नाश अशी स्थिती आहे की काय ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. कारणही तसेच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील जामिनावरील आरोपींकडून सध्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुरू असणारी दहशत आणि तीही दस्तुरखुद्द शहराच्या आमदारांच्या समोर.. आणि त्यातही पोलीस प्रशासनाकडून राजकीय दबावातून गुन्हेगारांना दिला जात असणारा सन्मान यामुळे नगर शहराचा बिहार होत असताना पोलीस हातावर हात ठेवून, डोळ्यावर पट्टी बांधत केवळ बघ्याच्या भूमिकेत का आहेत ? असा सवाल नगरकर जिल्ह्याच्या एसपी साहेबांना विचारत आहेत. एसपी साहेब, यापूर्वी विश्वासराव नांगरे पाटील, कृष्णप्रकाश यांनी ज्या पद्धतीने नगरच्या राजकीय गुन्हेगारीकरणाला वठणीवर आणण्याचे काम केले तीच अपेक्षा आता नगरकरांची तुमच्याकडून आहे.


मागील आठवड्यात शहरात लागोपाठ दोन दुर्दैवी घटना घडल्या. पहिल्या घटनेत गोरगरिबांसाठी, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले यांच्यासाठी काम करणाऱ्या संजय झिंजे यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या गुंडांच्या टोळीने शहराच्या आमदारांसमोरच मारहाण केली. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील पंजाबी समाजाच्या एका प्रतिष्ठित व्यापारी पती-पत्नीला त्याच राजकीय पक्षाच्या एका आघाडीचा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या कार्यकर्त्यांनी गंभीर मारहाण केली. दोन्ही घटनां मधील साधर्म्य म्हणजे या दोन्ही दहशत माजवणाऱ्या घटनांमधील हल्लेखोर हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणातील जामिनावरील आरोपी आहेत. 


संजय झिंजे हे मुळात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. स्वतः उद्योजक आहेत. त्यांच्या ज्या दोन तरूण पुतण्यांवर गुन्हे दाखल झाले ते देखील व्यापारी आहेत. झिंजे कुटुंबाची कोणत्या प्रकारची गुंडगिरीची पार्श्वभूमी नाही. शहराचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहराध्यक्ष होण्यापूर्वी झिंजे त्या पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत. 


शिवसेनेचे दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा हयातभर बोलबाला राहिला. शिवालय असणाऱ्या चितळे रोडवर त्यांचा मोठा दबदबा होता. त्यामुळे चितळे रोडवर तत्कालीन महापौर असणाऱ्या आजच्या विद्यमान आमदारांना राजकीय कार्यालय थाटण्यासाठी कोणीही जागा द्यायला तयार नव्हते. अशावेळी झिंजे यांनी स्व.राठोड यांचा राजकीय विरोध पत्करून आपली जागा विनामूल्य आमदारांना त्यांच्या संपर्क कार्यालयासाठी दिली. त्यांच्यासाठी राजकीय वैर घेतले.

एवढेच नाही तर त्यांना मध्यवर्ती शहरात राष्ट्रवादीसाठी कार्यकर्ते मिळवून देत राजकीय जुळवाजुळव देखील करून दिली. याचा आमदारांना विधानसभा निवडणुकीत फायदा देखील झाला. मात्र झिंजे यांनी एवढी राजकीय मदत केलेली असताना देखील त्यांच्या वाट्याला मात्र जे आले ते स्वभाविकच कोणत्याही कार्यकर्त्याला अस्वस्थ आणि अंतर्मुख करायला लावणारे आहे. विशेष म्हणजे झिंजे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना मारहाण होत असताना देखील ते त्यांच्या मदतीला धावून सुद्धा आले नाहीत. 

नागरिकांनी आपल्याला वाचवले नसते तर आपला जीव गेला असता असे गंभीर वक्तव्य झिंजे यांनी केले आहे. यामुळे उद्विग्न आणि अस्वस्थ झालेल्या झिंजे यांनी संग्राम जगताप यांचे शहरातील कट्टर विरोधक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालय गाठले. काळे यांनी यात खंबीर भूमिका घेत तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वात आधी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली. 

काळे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी शहरातील सर्व पक्षांना या विरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. शहरात पहिल्यांदाच राष्ट्रवादी वगळता काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, मनसे, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय, सैनिक पार्टी, राष्ट्रीय किसान पक्ष, कामगार संघटना, हॉकर्स युनियन यासह पुरोगामी विचारांच्या सर्व छोट्या-मोठ्या संघटना एकत्र आल्याचे प्रथमच पाहायला मिळाले. 


प्रातिनिधिक नेत्यांच्या शिष्टमंडळाशी सुमारे पाऊण तास चर्चा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सारख्या सीनियर आयपीएस अधिकारी एक मजला उतरून खाली आले आणि त्यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संबोधित केले. यामुळे शहरातील राजकीय गुंडगिरी उखडून टाकण्याच्या सर्वपक्षीय मागणीला बळ मिळाल्याची चर्चा शहरात सुरू झाली.


त्यातच शहरातील पंजाबी समाजाचे असणारे जग्गी ट्रान्सपोर्टचे संचालक राजू जग्गी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षानी बेदम मारहाण केली. त्यामुळे पंजाबी समाजात संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाली. मात्र उघड प्रतिकार कसा करायचा ? अशी कुजबूज समाजात सुरू झाली. म्हणून इच्छा असून देखील अनेकांनी पुढे येता येत नसले तरी अंधारात या दहशतविरोधात किरण काळे यांची भेट घेत मदत करण्याचे आवाहन पंजाबी समाजातील काही प्रतिनिधींनी केल्याचे समजते. याही प्रकरणात काळे यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जात जग्गी कुटुंबीयांची भेट घेत धीर दिला. एसपीं समोर या मारहाणी विरोधात काळेंसह सर्वपक्षीय शिषटमंडळाने दाद मागितली. 


मुळात हे सर्व होत असताना नगर शहराचा बिहार झाला आहे की काय ? अशी संतप्त प्रतिक्रिया मात्र आता समाजातून उमटू लागली आहे. विशेषत: कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणाऱ्या या घटनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तर एसपींच्या समोरच पोलीस स्टेशन म्हणजे आता राष्ट्रवादी भवन झाल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. दोन्ही पोलीस स्टेशनवर गंभीर स्वरूपाचे आरोप यावेळी करण्यात आले. घडणाऱ्या घटना पाहता पोलिसांची भूमिका बघ्याची असल्याची बोलले जात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये सर्रास खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. राजकीय संगनमत असल्याचे आता लपून राहिलेले नसून यामागे मोठे अर्थकारण असल्याचीही चर्चा होत आहे.

झिंजे प्रकरणात घटना घडल्याच्या दिवशी दुपारी पावणे दोन वाजता ते कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आपली फिर्याद दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र दुपारी दोन वाजता त्यांनी हल्ला करणाऱ्या टोळीतील एकाला मारहाण केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. मुळात अन्यायग्रस्त फिर्यादी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या समोर बसलेला असताना तो त्यावेळेला अन्य ठिकाणी उपस्थित राहून कसे काय कोणाला मारहाण करू शकतो ? ही साधी सरळ स्वच्छ वस्तूस्थिती असताना देखील पोलिसांनी अन्यायग्रस्ताच्याच विरोधात खोटा गुन्हा दाखल करून घेतलाच कसा ? याची सीआयडी मार्फत चौकशी का होऊ नये ? हा सवाल आहे. 

खरंतर दुपारी दोन वाजता झिंजे यांनी मारहाण केल्याची खोटी फिर्याद सुरज जाधव टोळीतील फिर्यादी देत असताना झिंजे दोन वाजता पोलिसांसमोरच बसलेले होते. हे पोलिसांना माहिती असून आणि ते त्या घटनेचे साक्षीदार असून देखील पोलिसांनी खोटी फिर्याद घेतली असल्याचे आता समोर आले आहे. एवढेच नाही तर झिंजे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार अर्ज देत शहराच्या आमदारांनी मला मारहाण होत असताना त्यांना वाचवल्याची खोटी माहिती एफआयआरमध्ये नोंदविण्यात आल्याचे म्हटले आहे. आपण असे काहीही सांगितलेच नव्हते. 

उलट त्यांच्यासमोर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून मला मारहाण झाली. तरी देखील ते मदतीला आले नाहीत. त्यामुळे एफआयआर मधून सदर खोटी माहिती वगळण्यात यावी, असा लेखी अर्ज त्यांनी केला आहे. मग पोलिसांनी नेमके कुणाच्या सांगण्यावरून, दबावातून आमदारांनी वाचविल्याचे फिर्यादीत नमूद केले ? हा संशोधनाचा विषय आहे. खर तर यासाठी त्यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणाकुणाचे फोन आले त्याचे कॉल डिटेल्स तपासण्याची गरज आहे. यातून धक्कादायक काही समोर आले तर आश्चर्य वाटू नये. यामुळे यामागे दडलेले अर्थकरण आणि राजकीय दबाव लपून राहिलेला नसल्याची कुजबूज नागरिकांमध्ये आहे. 

जग्गी प्रकरणात ही तसेच झाले. जग्गी पती-पत्नींना मारहाण झाल्यानंतर त्यांच्याच विरोधात काहीच तासांमध्ये तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली. ही फिर्यादी देखील खोटी असल्याचा जग्गी कुटुंबीयांचा दावा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील आरोपींना सन्मानाची वागणूक आणि पीडितांना मात्र जाच, एसपी साहेब, हा कुठला न्याय आहे ? तोफखाना, कोतवालीच्या पोलिसांना नक्की झाले तरी काय आहे ? पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांची देखील या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारीही नीट बोलत नाहीत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. उलट पक्षी त्यांच्यावरच चढ्या आवाजात त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र पोलिसांच्या विरोधात बोलायचे कोणी ? पोलिसां विरोधात बोललो तर खोटी फिर्याद, शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला तर करायचे काय ? या भीतीपोटी नागरिक पुढे येत नाहीत.

त्यामुळे एका बाजूला जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकरणातील जामिनावर असणाऱ्या आरोपींची शहरात असणारी दहशत, दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना न्याय मिळत नसल्याची झालेली भावना, यामुळे नगर शहराचा राजकीय वरदहस्तातून बिहार होत असून नगरची मान शरमेने खाली जात आहे. एसपी साहेब, यापूर्वी विश्वासराव नांगरे पाटील, कृष्णप्रकाश यांनी ज्या पद्धतीने नगरच्या राजकीय गुन्हेगारीकरणाला वठणीवर आणण्याचे काम केले तीच अपेक्षा आता नगरकरांची तुमच्याकडून आहे. तुम्ही न्यायाधीश राहिलेले आहात. एक माजी न्यायाधीश आता जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख आहे. 

त्यामुळे नगरच्या राजकीय वरदहस्तातून चालणाऱ्या गुन्हेगारीची पायमुळे पोलीस उखडून टाकणार आहेत की नाही ? कायद्याचे राज्य नगर शहरामध्ये पुन्हा आणण्यासाठी बघ्याची भूमिका घेणाऱ्या तुमच्या कनिष्ठ कार्यालयांमधील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही ? दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रमुखांवर होणारे गंभीर आरोप पाहता भाकरी करपण्यापूर्वीच तुम्ही ती फिरवून निष्कलंक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांच्या हाती सूत्र सोपवणार आहात की नाही ? असे अनेक प्रश्न नगरकर आता खाजगीत करू लागले आहेत. नगरचा बिहार होण्यापासून तो रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आता काय करतात हे पाहण्यासाठी मात्र नगरकरांना वाट पाहावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments