अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : शहर काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे जोरदार वारे सुरू आहेत. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची मोर्चे बांधणी हाती घेण्यात आली आहे. भाजप प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सहप्रमुख नदीम शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. 'शिवनेरी' पक्ष कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमामध्ये काळे यांनी शेख यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
शहर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी निवडीनंतर शहरातील अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते, नेते यांची राजकीय मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. चुडीवाला यांच्या पुढाकारातून अल्पसंख्यांक भाजप प्रदेश मोर्चाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याला शहरात काँग्रेसने गळाला लावले आहे. अल्पसंख्यांक समाज घटकांच्या संघटन वाढीसाठी विशेष रणनीती त्यांनी तयार केली आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून शेख यांचा काँग्रेस पक्षप्रवेश चुडीवाला यांनी काळे यांचे नेतृत्वाखाली घडवून आणला आहे. यावेळी मनपाचे माजी सहाय्यक लेखाधिकारी हाफिज सय्यद उपस्थित होते.
शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी काम करीत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कोरोना काळात त्यांच्यावर भाजपने प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाची सहप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपवली होती. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत करण्याचे काम केले आहे. तरुणांचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी आहे. शेख यांच्यासह कादिर शेख, तौसिफ सय्यद, फईम शेख, नदीम तांबोळी, शहाबाज शेख आदींनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रवेशानंतर नदीम शेख म्हणाले की, काँग्रेस पक्ष मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांसह सर्वच अल्पसंख्यांक घटकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. नगर शहरातील समाज बांधवांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शहराचा विकास रखडलेला आहे. किरण काळे यांचे विकासाचे व्हिजन पाहूनच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात काँग्रेसच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. तसेच पक्षाचे संघटन शहरामध्ये मजबूत करणार आहोत.
0 Comments