निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावणार, नवीन चेहऱ्यांना संधी देणार
प्रतिनिधी : कर्नाटक विजयानंतर महाराष्ट्रात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची मंगळवारी (दि.२३ मे) मुंबईच्या टिळक भवन प्रदेश कार्यालयात दुपारी १.०० वाजता प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. यावेळी शहराच्या पक्षीय कामकाजाचा आढावा वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.
अधिक माहिती देताना काळे म्हणाले की,
बैठकीस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे सर्व प्रदेश कार्याध्यक्ष, आजी-माजी आमदार, आजी-माजी खासदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह पक्षाचे जिल्हा प्रभारी यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीत पक्ष कामकाजाच्या आढाव्या बरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा होणार आहे.
आ. थोरातांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी
काळे म्हणाले, शहरात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविला जात आहे. भ्रष्टाचार, घोटाळ्यांचा भांडाफोड केला जात आहे. नगर शहराचा शतप्रतिशत विकास हे काँग्रेसचे ध्येय आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आगामी मनपा निवडणुकीसह लोकसभा, विधानसभेची देखील जोरदार तयारी सुरू आहे.
निष्क्रियांना नोटीसा, नवीन चेहऱ्यांना संधी
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडणार आहेत. तसेच पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या नवोदित चेहऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली जाणार आहे. पक्ष वाढीसाठी सक्रिय नसणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या जाणार असून योग्य खुलासा न आल्यास निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाणार आहे. त्या जागी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती, शहर जिल्हा सरचिटणीस तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी दिली आहे.
0 Comments