ही कसली मेट्रोसिटी ? हे तर खड्डेमय शहर आणि भ्रष्टाचारी, लुटारुंची टोळी.. किरण काळेंचा "त्यांच्यावर" घाणाघात
प्रतिनिधी : काँग्रेसने शहरातील रस्ते घोटाळ्यातील आणखी एका लाखोंच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. प्रभाग ४ मधील नगर मनमाड रोड ते साईदीप हॉस्पिटल दरम्यान असणाऱ्या सुस्थितीतील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी स्थायी समितीने २७ मार्च २०२३ रोजी मंजुरी दिल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह या रस्त्यावर पाहणी करत क्रिकेट खेळून रस्ता सुस्थितीत असल्याचे फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवरून व्हायरल केले आहेत. हा नगरसेवक, अधिकारी, ठेकेदारांचां मनपातील भ्रष्टाचाराचा कळस असल्याचा आरोप, काळे यांनी काँग्रेसच्या वतीने केला आहे.
छायाचित्रात सुस्थितीतील रस्ता दिसत आहे. सुस्थितीतील रस्त्याचा व्हिडिओ खाली आपण पाहू शकता.
काँग्रेसच्या रस्ता पाहणीच्या अनोख्या पद्धतीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. रस्त्यावर पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात किरण काळे यांनी जोरदार फलंदाजी केली. अनिस चुडीवालांनी गोलंदाजी केली. माजी नगरसेवक संजय झिंजे विकेट किपर होते. तर विलास उबाळे अंपायर झाले होते. माजी नगरसेविका जरीना पठाण, पूनमताई वंनंम या महिला खेळाडूंनी देखील यात भाग घेत शानदार खेळाचे प्रदर्शन केले. याशिवाय महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, सुनील भिंगारदिवे, इंजि. सुजित क्षेत्रे, गणेश आपरे, आकाश आल्हाट, प्रणव मकासरे, आनंद जवंजाळ, गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, अजय मिसाळ, बिभीषण चव्हाण, समीर शेख, सुरज घोडके, राकेश पवार, अक्षय साळवे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते.
नगर मनमाड रोड ते साईदीप हॉस्पिटल पर्यंतच्या सुस्थितीतील रस्त्यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते क्रिकेट खेळून रस्त्याच्या स्थितीची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी रंगलेला सामना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टचा वापर करून मनपातील रु.२०० कोटींचा घोटाळा काँग्रेसने उजेडात आणला. याबाबत मनपा व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात चौकशी सुरू असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसने मागणी लावून धरली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी मनपा आयुक्तांची भेट घेऊन सदर टेंडर रद्द करणे, बनावट ऑफिस रिपोर्ट तयार करणाऱ्यांवर व बनावट टेंडरला मंजुरी देणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने काँग्रेस करणार असून वेळप्रसंगी अँटी करप्शनकडे देखील तक्रार दाखल करणार असल्याचे काळेंनी म्हटले आहे.
किरण काळे म्हणाले की,
२७ मार्चच्या बैठकीत हॉस्पिटल समोरील रस्त्याची मे. बेस्ट कन्स्ट्रक्शनची सुमारे रु. २७ लाखांची मजबुतीकरण व डांबरीकरणाची निविदा क्र. ८५४२९५-१ मंजूर केली आहे. रस्ता सुस्थितीत असताना ही लिपिक, उपअभियंता, शहर अभियंता यांनी काही नगरसेवकांच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून हा रस्ता खराब असून करण्याची आवश्यकता असल्याचा खोटा, बनावट अहवाल तयार केला. त्यावर मुख्य लेखाअधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त (सा) यांच्यासह स्वतः आयुक्त पंकज जावळे यांनी देखील सहमतीदर्शक स्वाक्षरी करुन हा विषय मंजूरीसाठी ठेवला.
स्थायीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत हा बनावट ऑफिस रिपोर्ट पैसे खाण्याच्या हेतूने मंजूर करण्यासाठी प्रभाग २ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी आग्रह धरला. तर ठराव संमत करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच मध्य शहरातील नगरसेवकाने सूचक तर प्र.९ मधील भाजपच्या नगरसेवकाने अनुमोदक म्हणून भूमिका वठवली. प्र.४ मधील भाजपचे २ व राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे देखील यात संगनमत आहे. सदर रस्ता सुस्थितीत असल्याचे माहित असून देखील मलिदा लाटायला मिळणार या लालसेतून नगरसेवकांनी लाभार्थी होत अधिकारी, ठेकेदाराशी संगनमत करत नगरकरांच्या पैशांची लूट चालवली आहे. सहा महिन्यांनी होणाऱ्या मनपा निवडणुकीत हेच पैसे मतं विकत घेण्यासाठी वाटली जातील असा आरोप काँग्रेसने केला आहे. याच रस्त्याला लागून असणाऱ्या यशवंत कॉलनीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र हे रस्ते करायला मनपा तयार नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
छायाचित्रात याच रस्त्या लगत असणाऱ्या यशवंत कॉलनीतील रस्त्यांची दुरावस्था दिसत आहे.
काँग्रेसचे आव्हान
रस्त्यावर थातूरमधून एक कार्पेट थर लवकरात लवकर मारून तात्काळ बिल लाटण्याचा डाव आहे. त्या पार्श्वभूमी काँग्रेसने प्र. ४ चे व स्थायीतील नगरसेवकांना जनतेच्या वतीने या रस्त्याची ईन कॅमेरा पाहणीसाठी येण्याचे आव्हान दिले आहे. नगरसेवक आव्हान स्वीकारतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मनपाची उडवा उडवीची उत्तरे
मनपा बांधकाम विभागाकडून सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
ही कसली मेट्रोसिटी ?
दरम्यान, शहराच्या आमदारांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आमदारांनी शहराची वाटचाल मेट्रोसिटीच्या दिशेने सुरू असल्याचा दावा केला होता. किरण काळेंनी यावर सडकून टीका केली असून, मेट्रोसिटीकडे नव्हे तर खड्डेमय सिटीची आता भ्रष्टाचारी, लुटारुंच्या टोळ्या असणाऱ्या सिटीकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
आमदारांनी शहरात आयटी पार्क उभा केल्याचा पुनरुच्चार या मुलाखतीत केला होता. त्याचाही काळेंनी खरपूस समाचार घेतला असून शहरात कोणताही आयटी पार्क आमदारांनी उभा केला नसून आमदारांनी आयटी पार्कच्या नावाखाली शहरातील शेकडो तरुणांची फसवणूक केली आहे. आताही ते शहरातील तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत आमदारांवर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच काळेंनी हल्लाबोल करत तोफ डागली आहे.
प्रत्यक्ष लोकेशन वरील फेसबुक लाईव्ह लिंक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=6351581921593554&id=100000770898898&mibextid=Nif5oz
0 Comments