विधानसभा विशेष : शरद पवार विधानसभेला करणार बाळासाहेब थोरात यांच्या मदतीची परतफेड ?
उद्धव ठाकरेंचा श्रीगोंद्यासाठी आग्रह !
प्रतिनिधी : आज शरद पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्याचवेळी मुंबईत प्रदेश काँग्रेसची अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी रमेश चेंनीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काँग्रेसने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला.
नुकताच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांनी देखिल जिल्हा दौरा केला. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील जागावाटप आणि उमेदवार निश्चितीसाठी वेगवान घडामोडी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
श्रीगोंद्यात शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून साजन पाचपुते यांच्या नावाची संजय राऊत यांनी थेट घोषणाच करून टाकली. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून पारनेर विधानसभेत राणीताई लंके याच उमेदवार असतील हेही सांगून टाकले. राऊत त्यांनी श्रीगोंद्याच्या केलेल्या घोषणे पूर्वी राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. तसे असल्यास राऊत यांचे वक्तव्य महाविकास आघाडीतील श्रीगोंदा तालुक्यातील घटक पक्षांच्या इच्छुकांना अपरिहार्यपणे गांभीर्याने घ्यावे लागणार आहे.
दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या विजयाचे किंगमेकर, काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे बडे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आपली सर्व ताकद शरद पवार यांच्या सांगण्यावरून आणि आघाडीचा धर्म निभावत लंके यांच्या पाठीशी उभी केली होती. विखेंच्या यंत्रणेला तोडीस तोड किंबहुना वरचढ अशी यंत्रणा आणि सर्व प्रकारची रसद थोरात यांनी पवारांच्या उमेदवारा मागे उभी केली. त्यामुळेच लंके यांचा विजय झाला आणि जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणामध्ये इतिहास घडविण्यामध्ये पवार, थोरात यांना लंके यांच्या रूपाने यश आले.
आगामी काळात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतच्या देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. जशी दक्षिणेत थोरात यांची किंगमेकर भूमिका होती तशीच ती उत्तरेमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील खासदार करण्यामध्ये होती हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्यात दोन्ही खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेचे झाले असले आणि या विजयाचे किंगमेकर थोरात असले तरी देखील काँग्रेसच्या पदरात स्वतःची हक्काची एकही खासदारकी पडलेली नाही हे देखील तितकेच खरे आहे.
त्यातच काँग्रेसकडे केवळ उत्तरेतच दोनच विद्यमान आमदार स्वतः थोरात संगमनेर आणि श्रीरामपूर मध्ये आ. लहू कानडे यांच्या रूपाने आहेत. त्यामूळे नगर दक्षिणेत देखील काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून नगर शहरात ताकद लावत काँग्रेसने मोठी रणनीती आखली असल्याचे दिसते आहे.
येत्या विधानसभा निवडणुकी नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आत्ता जी सर्वेक्षणे समोर येत आहेत त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत महाविकास आघाडीत मोठा भाऊ होईल असे चित्र दिसत आहे. अशा वेळी राज्याच्या राजकारणातील काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते असणारे बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री पदाची नामी संधी, दक्षिणेतून नामशेष होत असलेली काँग्रेस, त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर जर काँग्रेस जिवंत ठेवायची असेल आणि संघटनात्मक दृष्ट्या बळकट करायची असेल तर नगर शहर विधानसभा हा एकमेव मतदार संघ शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे आणि थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू असणारे किरण काळे यांच्या माध्यमातून थोरात यांना जिंकावाच लागेल अशी अपरिहार्यता काँगेसची झालेली आहे.
काँग्रेसने दक्षिणेतील श्रीगोंदा मतदार संघावर देखील दावा सांगितला आहे. सध्या अजित पवारांच्या पक्षात असणारे राजेंद्र व अनुराधा नागवडे दांपत्य काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासाठी थोरात यांनी निश्चित ताकद लावली असती. मात्र आज तेही पक्षांतर करून गेले आहेत. घन:श्याम शेलार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, बीआरएस असा मोठा राजकीय पक्षांतराचा प्रवास करून ऐन वेळी लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
माञ संजय राऊत यांनी तिथे साजन यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आणि अलीकडेच काँग्रेस मध्ये दाखल झालेल्या शेलार यांच्यासाठी काँग्रेस फारशी उत्सुक नसल्यामुळे काँग्रेसला त्या ठिकाणी संधी मिळणे अवघड झाले आहे. श्रीगोंद्याची जागा शिवसेनेने घेतल्यामुळे नगर शहराच्या जागेवरचा त्यांचा दावा संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
स्वतः उद्धव ठाकरे हे देखील साजन पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी श्रीगोंद्यातून शिवसेनेला जागा मिळावी यासाठी शरद पवार यांच्याकडे आग्रही असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
त्यामुळेच नगर दक्षिणेत श्रीगोंदा शिवसेनेला जात असताना नगर शहर किरण काळे यांच्या करिता काँग्रेसलाच मिळावे याकरिता थोरातांनी पवार यांच्याकडून लोकसभा निवडणुकीला मदत करण्याच्या बोलीवर त्याच वेळी वाटाघाटी करत शब्द घेतल्याची माहिती समोर येत आहे. शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या गटात सामील होत महायुतीचे आमदार झाले आहेत.
त्यामुळे महायुतीची उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास थोरात यांचे उमेदवार म्हणून किरण काळे तर त्याविरुद्ध अजित पवार गटाचे संग्राम जगताप असा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना नगर शहरामध्ये रंगलेला पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
त्यातच ज्या पद्धतीने लंकें साठी थोरात यांनी बलाढ्य यंत्रणा आणि सर्व प्रकारची रसद जशी पुरविली तशीच रसद काळे यांना देखील थोरात देत सध्याच्या परिस्थितीमध्ये जगताप यांच्या विरुद्ध असणाऱ्या नाराजीचा आणि महायुतीच्या विरोधात असणारा मतदारांचा कल या परिस्थितीचा पुरेपूर राजकीय फायदा उठवत काळे यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान त्यांनी केल्यास नवल वाटू नये.
ज्या थोरात यांच्या माध्यमातून लंके खासदार झाले त्याच लंके यांच्यावर आता काळे यांच्या प्रचाराची धुरा त्याच बरोबर काळे यांच्या विजयासाठी दस्तुरखुद्द शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील नगर शहराच्या मैदानात प्रचारासाठी उतरविण्याची रणनीती थोरात आखल्या शिवाय राहणार नाहीत असे आज तरी दिसते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ज्येष्ठ नेते दादा कळमकर हे त्यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांच्यासाठी आग्रही आहेत. कळमकर हे पवारांचे जुने विश्वासू आहेत.
मात्र असे असले तरी देखील आज राजकीय दृष्ट्या थोरात यांनी पवारांकडे किरण काळे यांच्यासाठी यापूर्वीच लोकसभेला मदत करताना शब्द टाकलेला असल्यामुळे कळमकरां पेक्षा थोरात यांचा शब्द डावलणे हे पवारांसाठी नक्कीच सोपे नाही. कारण थोरात हे राज्यातील काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यांचे राजकीय वजन देखील मोठे आहे.
त्यामुळे एकूण राजकीय परिस्थिती पाहता शरद पवारांना बाळासाहेब थोरात यांनी लंकेच्या विजयासाठी विखे पाटील परिवाराच्या विरोधात केलेल्या मदतीची परतफेड म्हणून नगर शहराची जागा ही काँग्रेसला सोडावीच लागेल असा कयास एका बाजूला बांधला जात असताना याबाबत पवारांनी देखील थोरात यांना जागा सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या अनुषंगाने आगामी काळात काय राजकीय धुळवड उडते हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे.
किरण काळे हे संग्राम जगताप यांच्या पुढे टिकतील ?
आज रोजी शहरात संग्राम जगताप यांचा मोठा बोलबाला आहे. त्यांची स्वतःच्या राष्ट्रवादी अजित पवार गटावर त्याचबरोबर महायुती तील दोन्ही घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिंदे सेना यासह विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवकांवर पकड आहे. त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांचा राजकीय दांडगा अनुभव असून शहराच्या कानाकोपऱ्यात जनसंपर्क आहे. किरण काळे हे त्या तुलनेत नवखे आहेत. त्यांना जगताप यांच्या प्रमाणे कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असले तरी जगताप यांना थेट अंगावर नव्हे तर शिंगावर घेत लढण्याची त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांच्या नंतर राठोड यांच्या प्रमाणेच जगताप यांना राजकीय विरोध करणारा चेहरा म्हणून काळे यांच्याकडे पाहिले जात आहे.
गलित रात्र झालेल्या काँग्रेस पक्षाला काळे हे सुमारे चार वर्षांपूर्वी अध्यक्ष झाल्यापासून शहरामध्ये नवसंजीवनी मिळाली आहे. कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांनी उभा केला आहे. त्यातच काळे यांना थोरात यांनी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देत लंके यांच्या प्रमाणे आपली यंत्रणा आणि सर्व रसद पुरविल्यास २०१४ च्या निवडणुकीत थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधरचे विद्यमान आ. सत्यजित तांबे यांच्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत थोरात दिसत आहेत. थोरात यांची स्वच्छ असणारी प्रतिमा, त्याचबरोबर त्यांना नगर शहरामध्ये मानणारा मोठा वर्ग देखील आहे. काळे यांच्या रूपाने नगर दक्षिणेमध्ये काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी त्यांना एक आक्रमक नेता मिळणार आहे.
काळे यांच्या विजयासाठी थोरात हे शरद पवार, उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना सुद्धा नगरच्या राजकीय आखाड्यामध्ये उतरविल्या शिवाय राहणार नाहीत. असे झाल्यास काळे विरुद्ध जगताप असा जोरदार सामना रंगलेला नगर मध्ये पाहायला मिळेल.
थोरात यांनी स्वतः केलेले भाकित खरे ठरणार काय ?
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नगर शहरामध्ये किरण काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काढलेल्या जनसंवाद यात्रा व त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना स्वतः बाळासाहेब थोरात यांनी, "नगर शहराच्या विकासासाठी किरण काळे यांना आमदार व्हावच लागेल" असे जाहीर वक्तव्य करत काळे यांच्या उमेदवारीचे संकेत लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिले होते.
थोरात राजकीय दृष्ट्या सावधपणे बोलतात असा त्यांचा स्थायीभाव आहे. त्याच थोरात यांनी अशा पद्धतीने नगर शहरात काळेंबद्दल वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता तर त्यांनी काळे यांच्यासाठी जोर लावल्याचे दिसत असल्यामुळे थोरात यांनी त्यावेळी व्यक्त केलेले भाकीत प्रत्यक्षात खरे होणार काय हे येणारा काळच दाखवून देणार आहे.
0 Comments