Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग न्यूज : बहुचर्चित १५० कोटींच्या रस्ते घोटाळा प्रकरणी किरण काळेंना जबाब नोंदविण्यासाठी अँटी करप्शनचे बोलावणे

 

मनपा प्रशासन, कंत्राटदारांचे धाबे दणाणले... काळे बुधवारी सादर करणार पुरावे

प्रतिनिधी : शहर मनपा क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट कामे करत गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून सुमारे १५० कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची फिर्याद शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेट घेत दाखल केली होती. याप्रकरणी आता अँटीकरप्शन विभागाने फास आवळला असून तक्रारदार किरण काळे यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी पत्र पाठवत बोलविले आहे. यामुळे मनपा प्रशासन, या भ्रष्टाचारात गुंतलेले कंत्राटदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

अँटी करप्शन विभागाचे नगर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिकूटे यांनी काळे यांना लेखी पत्र दिले असून त्यात नमूद केले आहे की, आपण सन २०१६ ते २०२३ या कालावधीतील नगर महानगरपालिकेतील आयुक्त व संबंधित कामाशी निगडित इतर अधिकारी यांचे विरुद्ध दिलेल्या तक्रार अर्ज माननीय मुख्यालय यांच्याकडील दि. २४ जानेवारी २०२४ आणि माननीय परिक्षेत्रीय कार्यालयाकडील दि. २४ जून २०२४ रोजीच्या पत्रा अन्वये चौकशी कामी प्राप्त झाला आहे. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे चौकशी करणे असल्याने आपण आपले म्हणणे सादर करण्याकरिता आपल्या कडील पुराव्यांसह मंगळवार दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टीव्ही सेंटर या ठिकाणी हजर राहून सहकार्य करावे. 


याबाबत किरण काळे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत. अनेकांना यामुळे अनेक आजार जडले. नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांची जागा तुरुंगात असून चौकशीतून कुणी ही सुटणार नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 


काळे बुधवारी पुरावे सादर करणार 



दरम्यान, किरण काळे यांना मंगळवारी हजर होणे शक्य नसल्यामुळे बुधवारी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे माहिती अधिकारातील सर्व पुरावे अँटीकरप्शन पोलिस उप अधीक्षकांना सादर करून त्यांना या भ्रष्टाचाराबद्दल सविस्तर माहिती देत त्यांचा जबाब नोंदविणार आहेत. यामुळे रस्ते घोटाळ्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले असून पुढे काय कारवाई होते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments